अडीच लाखांच्या गांजासह तरुणाला अटक – करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा (दि.२५) : गुप्त माहितीवरून करमाळा पोलिसांनी टेंभुर्णी-करमाळा महामार्गावर हॉटेल निसर्गजवळ केलेल्या कारवाईत 10 किलो 330 ग्रॅम गांजासह एक तरुण पकडला आहे. अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने तो गांजा घेऊन आल्याची माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 2 लाख 58 हजार 250 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असलेल्या पोलिसांनी गोपनीय बातमीच्या आधारे ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून हॉटेल निसर्गजवळील कुंभेज फाट्यावर संशयित इसमाला ताब्यात घेतले. गौरव प्रकाश माल्हिकर (वय 23, रा. दत्तनगर, पुणे, मूळ रा. गेवराई, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

तपासादरम्यान गौरवच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये खाकी रंगाच्या टेपने बंद केलेली दोन पाकिटे सापडली. त्यामध्ये झाडपत्ती सारखा, उग्र वास असलेला गांजा आढळला. पंचासमक्ष वजन करून पोलिसांनी गांजा जप्त केला असून त्यासंबंधी सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे.


सदर प्रकरणी एन.डी.पी.एस. अॅक्टच्या कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) अंतर्गत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीकडून गांजा कोठून आणला गेला आणि तो कोणाला विक्रीसाठी नेत होता, याचा तपास सुरू आहे.



