केतूरमध्ये कौटुंबिक वादातून तरुणीला मारहाण..

करमाळा : केतूर नं. २ येथे कौटुंबिक वादातून शेजाऱ्यांनी एका तरुणीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी सावित्री प्रदिप केवटे (वय २३) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास सावित्रीबाई केवटे या घरासमोर उभ्या असताना शेजारी राहणारे सचिन हरी डिरे, ललिता सचिन डिरे व मंगल हरी डिरे यांनी फिर्यादीवर चुकीचा आरोप करून शिवीगाळ केली. यावेळी मंगल डिरे हिने फिर्यादीला पकडले व ललिता डिरे हिने काठीने हातावर, पायावर व पाठीवर मारहाण केली. सचिन डिरे यांनी देखील धमकी दिली. मोठ्याने आरडाओरडा केल्यानंतर तिला सोडण्यात आले. या सर्वांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



