अपघातात शेलगाव (वांगी) येथील युवकाचे निधन
करमाळा (दि.२७) : कंटेनर व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील १९ वर्षाच्या युवकाचे निधन झाले आहे. हा अपघात २३ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता जेऊर-टेंभूर्णी रस्त्यावर शेलगाव (वांगी) गावाजवळ घडला आहे. या प्रकरणी गोकुळ गणेश करांडे (रा. शेलगाव वांगी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की २३ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माझा भाऊ गोविंद गणेश करांडे (वय-१९) हा बजाज प्लसर मोटारसायकलवरून जात असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यास जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर त्याला अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मिरजगावाजवळच त्याचे निधन झाले.
या प्रकरणी पोलीसांनी कंटेनरचालका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.