कुकडी-उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी जलसंपदा विभागाकडे ४७ लक्ष निधीची मागणी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन / बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध होणे संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी केली होती. या मागणीला अनुसरून कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे सर्वेक्षणासाठी 47 लाख रुपये निधीची मागणी केलेली असून, अंदाजे बजेटनुसार संपूर्ण योजनेच्या पूर्ततेसाठी भूसंपादन ,मुख्य पाईपलाईन, पंप हाऊस ,पंप इत्यादी कामांसाठी 424 कोटी 94 लक्ष निधी ची आवश्यकता असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.
आ.संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्येच कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केलेली होती, परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे तो विषय प्रलंबित होता. विद्यमान महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आ.शिंदे यांनी 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची मागणी केली.
त्यानुसार सदर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाला सादर झालेला असून त्यामध्ये कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लक्ष निधीची मागणी केली आहे.
अशी असेल कुकडी उजनी उपसा सिंचन योजना…
आमदार संजयमामा शिंदे यांची संकल्पनेनुसार प्रस्तावित केलेली कुकडी उजनी उपसा सिंचन योजना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दोन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केलेली आहे.
टप्पा 1 –
रिटेवाडी येथून पाणी उचलून ते मोरवड येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉल मध्ये टाकले जाईल. हे अंतर 20.13 किमी आहे त्यासाठी 18 00 मी मी व्यासाच्या 2 समांतर पाईपलाईन व 32 34 अश्वशक्ती क्षमतेचे 8 विद्युत पंप सुचविलेले आहेत. या पहिल्या टप्प्यातील योजनेमधून 18472 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
टप्पा 2 –
या टप्प्यात केतुर येथून पाणी उचलून ते सावडी येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉलमध्ये टाकले जाईल. हे अंतर 17.60 किलोमीटर असून त्यासाठी 800 मी मी व्यासाची 1 पाईपलाईन सुचविलेली आहे. सदर पाणी उचलण्यासाठी 3100 अश्वशक्तीचे 4 विद्युत पंप सुचविलेले आहेत. सदर टप्प्यावरून 5790 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.