रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला गती — मंत्रालयात विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

करमाळा: तालुक्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात मंगळवारी (दि.११ नोव्हेंबर)मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वेक्षणानुसार संबंधित अधिकाऱ्यांना योजनेचे निकष तपासून अहवाल सादर करण्याचे आणि सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना रश्मी बागल म्हणाल्या की, रिटेवाडी उपसा योजना पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या योजनेमुळे तालुक्यातील सुमारे चाळीस गावांना फायदा होणार आहे. सरकार या योजनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून, ही योजना मार्गी लागण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

करमाळा तालुक्याला कुकडी प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे, यासाठी टेल टू हेड या पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार असून कालव्यांच्या अस्तरीकरणाचे काम देखील करण्यात येईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना रश्मी बागल म्हणाल्या की, या मीटिंग मध्ये कुकडीच्या योजनेसंदर्भात चर्चा करताना विखे पाटील यांनी माजी मंत्री स्व दिगंबरराव बागल यांनी कुकडीच्या योजनेसाठी आपल्याकडे आग्रह केला होता. त्यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आदेश दिले व सदरील योजना मार्गी लागली.


