दारुबंदीचे आव्हान स्वीकारत पोथरेकर एकवटले – करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पोथरे (ता. करमाळा) येथे गावाच्या मुख्य वेशीवर असणाऱ्या बसस्थानकावर तीन दुकानांतून उघडपणे दारू विक्री चालू आहे. यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत दारूबंदी करावी अशी मागणी केली होती. परंतु “गावात दारुबंदी करून दाखवा २१ हजार रुपये देऊ” असे आव्हानच दारू विक्रेत्यांनी गावकऱ्यांना दिल्याने गावकऱ्यांनी एकत्र येत ४ ऑगस्ट रोजी करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात पोथरे गावातील पुरुषांसह अनेक महिला देखील उपस्थित होत्या.
याविषयी पार्श्वभूमी अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून पोथरेतील बसस्थानकावर उघडपणे २४ तास दारू विक्री होत आहे. या बसथांब्यावर शाळकरी मुली, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ, प्रवासी यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दारूड्यांचा दिवसभर बसस्थानकावर सतत धिंगाणा चालू असतो. शिवीगाळ, हाणामारी, अश्लिल शेरेबाजीमुळे महिला, मुली बसस्थानकावर जीव मुठीत घेऊन बसची वाट पाहात असतात. दारूमुळे गावातील अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. आठ दिवसांपूर्वीच एकाने दारूमुळे आत्महत्या केली, असे यावेळी सांगण्यात आले. गावात ऐतिहासिक शनेश्वराचे मंदिर आहे. इथे विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा दारूड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. गावाची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

या अवैध दारू दुकानामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी बऱ्याचदा तक्रारी दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई ही झाली होती, परंतु पुन्हा सदरची दुकाने चालू होत असून उघडपणे दारू विक्री केली जाते. याविषयीची नाराजी दारू विक्रेत्यांकडे केल्यानंतर त्यांनी दारूबंदी करून दाखवा २१ हजार रुपये देऊ असे आव्हान केले. त्यानंतर गावकरी ४ ऑगस्टला एकत्र येउन करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. करमाळा पोलिसांना निवेदन दिले आहे. दारूबंदी करावी अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट ला आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी करमाळा पोलिसांनी योग्य ती कारवाई केली जाईल दोन दिवसात सर्व दुकाने बंद केली जातील असे आश्वासन दिले आहे. सदर निवेदनावर 100 पेक्षा जास्त गावकऱ्यांच्या सह्या आहेत यावेळी महिलाही बहुसंख्येने उपस्थित होत्या.

गावकऱ्यांना चॅलेंज म्हणजे पोलीस प्रशासनाला चॅलेंज – प्रत्येक वेळेस दारुबंदीची कारवाई केली की ८-१० दिवसात परत दारू विक्री सुरू होते. यावर कायम स्वरूपी तोडगा काढा. गावात दारूबंदी होऊच शकत नाही तुम्ही दारुबंदी करून दाखवा आम्ही २१ हजार रुपये देऊ असे आव्हान दारु विक्रेत्यांनी केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावेळी गावकऱ्यांना चॅलेंज म्हणजे पोलीस प्रशासनाला चॅलेंज दिले आहे आणि ते आम्ही चॅलेंज स्वीकारून संबंधितांवर विविध केसेस दाखल करून कारवाई करू असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले.

