मारहाण केल्याचा गुन्हा सिध्द – आरोपीची चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर सुटका
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मारहाण केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने येथील न्यायाधीश भार्गवी भोसले यांनी एका आरोपीस दोषी धरले असून चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर व दहा हजार रूपयाच्या जामीनावर आरोपीची सुटका केली आहे.
करंजे (ता. करमाळा) येथील विक्रम वसंत ठोसर यांनी फिर्याद दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, की १० फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी सहा वाजता मी व माझा भाऊ सुकाचार्य ठोसर, दादा ठोसर, राहुल ठोसर समाजमंदिरासमोर बसलो होतो. त्यावेळी गोकुळ जगन्नाथ ठोसर तेथे आला व त्याने मला व माझ्या भावास शिव्या दिल्या. तसेच बुक्की मारली. त्यानंतर बारीक ठोसर, दादा ठोसर, राहुल ठोसर यांनी सोडवायचा प्रयत्न केला. परंतु गोकुळ ठोसर याने जवळचा दगड उचलून मला व माझ्या भावाच्या डोक्यात मारून जखमी केले.
त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणी तपास करून दोषारोप पत्र सादर केले. न्यायालयात या खटल्याची चौकशी झाली. त्याच्यामध्ये फिर्यादी, त्याचा भाऊ शुक्राचार्य ठोसर, बारीक ठोसर, पोपट ठोसर, तपासणी अंमलदार विजय थिटे, मेडिकल ऑफिसर डॉ. राहुल कोळेकर यांची तपासणी झाली. यात शासकीय अभियोक्ता म्हणून अॅड. सचिन लुणावत यांनी फिर्यादीची बाजू मांडली. यानुसार सदर प्रकरणातील आयपीसी ३२३, ५०४ या कलमातून आरोपी गोकुळ ठोसर यांची मुक्तता केली. परंतु आयपीसी ३२४ प्रमाणे फिर्यादीला व त्याच्या भावास मारहाण केल्याचा गुन्हा सिध्द झाला.
त्यानंतर न्यायाधीश भोसले यांनी प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅक्ट कलम ४ नूसार चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर व १० हजार रूपयाच्या जामीनावर एक वर्षे चांगल्या वर्तणुकीची अट घालून आरोपीची सुटका केली आहे. तसेच आरोपीने फिर्यादी व त्याचा जखमी भाऊ यांना नुकसान भरपाई म्हणून सहा हजार रूपये भरण्याचा आदेश केला आहे. या प्रोसिडींगचा खर्च म्हणून दोन हजार रूपये न्यायालयात भरण्याचाही आदेश केलेला आहे.