वांगी नं.३ येथे वाळूची चोरी करणाऱ्यावर कारवाई..

करमाळा : वांगी नं. ३ येथील उजनी पात्रातून वाळूची चोरी करणाऱ्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ मे ला पहाटे ३ वा. १० मि. घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ महादेव जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की वांगी येथून वाळू चोरी होत असल्याची माहिती समजल्यावर पोलीस निरीक्षक रणजित माने, हवालदार गवळी, पोलीस नाईक पवार, पोलीस नाईक ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल गटकुळ, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे व पोलीस कॉन्स्टेबल आलदर असे आम्ही सर्वांनी मिळून वांगी नं.३ येथे उजनी जलाशयाकडे जाताना समोरून पांढऱ्या रंगाचा लेलॅन्ड टेम्पो आढळून आला. सदरचा टेम्पो पाहिला असता त्यामध्ये १ लाख ८० हजार रूपयाची १८ ब्रास वाळू आढळून आली. सदर टेम्पोत सुहास भारत तावसे रा. वांगी नं. ३ व त्याच्या शेजारी राजेश महेंद्र रोकडे हा बसलेला होता. सदरचा टेम्पो थांबवण्यास सांगूनही तो थांबला नाही. त्यामुळे त्याचा पाठलाग करून त्यास आडवून तो टेम्पो जप्त केला आहे. टेम्पो व वाळू असा ४ लाख ९० हजाराचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.




