१५ ऑक्टोबरला आदिनाथचा बॉयलर पेटणार
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – येत्या रविवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी आदिनाथनगर (जेऊर) येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा २८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारोह पार पडणार आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन केले जाणार आहे. यावेळी भैरवनाथ शुगर वर्क्सचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज शिवाजीराव सावंत अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस यामुळे तसेच उजनी बॅकवॉटर क्षेत्रामध्ये उसापेक्षा केळी लागवड मोठया प्रमाणात झाल्यामुळे तालुक्यात उसाचे उत्पादन घटलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आदिनाथची तालुक्यातील भैरवनाथ, कमलाई, मकाई या कारखान्यांबरोबर व तालुक्याबाहेरील बारामती ॲग्रो, अंबालिका, दौंड शुगर, श्रीराम शुगर आदी कारखान्यांबरोबर स्पर्धा असणार आहे. त्यामुळे आदिनाथला जास्तीत जास्त दर देऊन स्पर्धेत राहावे लागणार आहे व सभासदांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे.
मागील वर्षी आदिनाथ ने ७५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यावर्षी परिस्थिती वेगळी असल्याने किती गाळप होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.



