मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी काळजी घ्यावी : ॲड.डॉ.बाबुराव हिरडे
केत्तूर ( अभय माने) : पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत मुले व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यावी असे आवाहन समाज प्रबोधनकार ॲड.डॉ. बाबुराव महाराज हिरडे यांनी केले.ते केत्तूर (ता.करमाळा) येथे शनिवार (ता.20) रोजी हनुमान जयंती निमित्त हरिनाम सप्ताहात समाजप्रबोधनपर कीर्तनात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, केवळ नोटांनी श्रीमंती ठरत नाही तर, आपले कार्य व जे संकटात मदत करतात त्यावर ठरते. आपल्यात नम्रता, निष्ठा, नैतिकता आणि निरपेक्षता असेल तर हातून चांगले कामे होतात आणि त्यातून आपली ओळख निर्माण होते.असेही त्यांनी सांगितले.यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.या सप्ताहा दरम्यान सांप्रदायातील नामांकित व समाजाला प्रबोधन करणारे कीर्तनकार महाराज आपली कीर्तन सेवा करणार आहेत यामध्ये हभप नाना महाराज पांडुळे (दिवेगव्हाण),हभप पोपट महाराज कासारखेडकर (आळंदी),हभप समाधान महाराज भोजेकर (खानदेश),यांची सेवा झाली तर ॲड.डॉ.बाबुराव महाराज हिरडे (करमाळा),हभप आकाश महाराज कामथे (जेजुरी),हभप गायनाचार्य माऊली महाराज झोळ (वाशिंबे),हभप गुरुवर्य कान्होबा महाराज देहूकर (पंढरपूर),हभप गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे हासेगावकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकड आरती सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 11 ते 12 गाथा भजन दुपारी 1 ते 5 नामजप सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन तर रात्री 9 ते 10 जेवण व 11 नंतर हरिजागर असा कार्यक्रम होणार आहे. गावातील विविध मान्यवरांनी अन्नदानासाठी मागील वर्षीच आपल्या नावाची नोंद केली असून दररोज सकाळी नाष्टा, दुपारचे जेवण व संध्याकाळी कीर्तन सेवा संपल्यानंतर अन्नदान मोठ्या प्रमाणावर होत आहे.यावेळी मृदंगाचार्य म्हणून हभप महेश महाराज येवले तर व्यासपीठ चालक म्हणून हभप कल्याण महाराज जाधवर (बार्शी) हे आहेत. तरगायक हभप निळकंठ महाराज काळे व हभप परबत महाराज काळे हे आहेत. परिसरातील भाविकांनी कीर्तन सेवेचा व अन्नदानाचा लाभ घेण्याची आवाहन हनुमान मित्र मंडळ केत्तूर नं.2 (पारेवाडी रेल्वे स्टेशन) यांनी केले आहे.