कुगाव येथील प्रगतशील केळी उत्पादक शेतकरी ॲड. विजयराव कोकरे यांना 'महाराष्ट्र केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार' जाहीर... -

कुगाव येथील प्रगतशील केळी उत्पादक शेतकरी ॲड. विजयराव कोकरे यांना ‘महाराष्ट्र केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार’ जाहीर…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कुगाव (ता.करमाळा) येथील प्रगतशील केळी उत्पादक शेतकरी ॲड.विजयराव कोकरे यांना महाराष्ट्र केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला असून, ॲड. कोकरे यांनी केळी पिकात विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन मिळवलेले असून त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने यावर्षीचा महाराष्ट्र केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार त्यांना 23 एप्रिल रोजी रावेर (ता.रावेर,जि.जळगाव) येथे प्रभाकर महाजन बहुउद्देशीय सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ॲड.कोकरे हे कुगाव येथील उच्चशिक्षित शेतकरी असून, त्यांनी कायद्याची पदवी घेऊनही स्वतः शेती करत आहेत, आपल्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिकांमध्ये भरघोस उत्पादन घेण्याचा विक्रम आजपर्यंत केलेला आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून केळी पिकामध्ये विविध प्रयोग करत त्यांनी विक्रमी उत्पादन साधत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यांचे केळी क्षेत्रातील योगदान इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष किरणराव चव्हाण यांनी दिली. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे अभिनंदन केले जात असून केळी उत्पादक शेतकरी संघाचे तालुका अध्यक्ष वैभव पोळ यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!