२८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दहिगाव उपसासिंचन योजनेतून नेरले तलाव भरण्यास सुरवात
करमाळा (दि.६) – उजनी धरणातील ओव्हर फ्लोच्या पाण्याने दहिगाव उपसा सिंचन योजनेतुन नेरले तलाव भरून घेण्याचे शासकीय धोरण असताना देखील गेली २८ वर्षे दहिगाव उपसा सिंचन योजनेतुन नेरले तलावात पाणी सोडण्यात आले नव्हते. विविध गावातील नागरिकांनी २३ ऑगस्ट रोजी आळसुंदे येथे केलेल्या रस्ता रोको आंदोलनानंतर १ सप्टेंबर पासून नेरले तलावासाठी पाणी सोडण्यात आले व कालपासून (दि.५) प्रत्यक्षात तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली.
‘नेरले तलाव भरावा’ अशी मागणी या गावातील नागरिकांकडून अनेक वर्षापासून केली जात होती. यावर्षी उजनी धरण ५ ऑगस्टलाच १०० टक्के भरल्याने उजनीच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने नेरले तलाव भरण्याची आशा निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर दि.२३ ऑगस्ट रोजी करमाळा तालुक्यातील आळसुंदे येथे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी टेल टू हेड या शासकीय धोरणानुसार सोडावे व नेरले तलाव हा दहिगाव उपसा सिंचन या योजनेतून भरावा यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आळसुंदे फाट्या वरील रस्ता अडवून हे आंदोलन करण्यात आले. दहिगाव उपसा सिंचनचे अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन व करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मध्यस्थी करून हे आंदोलन स्थगित केले होते.
या आंदोलनाची दखल घेत १ सप्टेंबर पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेतून नेरले तलावासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांचे आंदोलनाला यश आले आहे. नेरले तलावापर्यंत पाणी येण्यासाठी सुमारे १० बंधारे भरावे लागले आहेत. नेरले तलाव भरण्यास सुरवात व्हायला लागल्याने नेरलेसह, आळसुंदे, सालसे,वरकुटे,आवाटी या गावांना या पाण्याचा फायदा होणार असल्याने या गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
नेरले तलावात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी विविध गावातील सुमारे ४० लोकांनी २३ ऑगस्टला आळसुंदे येथे रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनासाठी दि.१६ ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशनला निवेदन दिले होते. २३ ऑगस्टला आंदोलना दरम्यान सकाळी पावणे अकरा वाजता पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मध्यस्तीने दहिगाव उपसा सिंचनचे अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन पत्र दिल्याने आंदोलन स्थगित केले; परंतु त्याच दिवशी पावणे पाचला रस्ता अडविल्याप्रकरणी पोलिसांनी विनाकारण ४० आंदोलकांवर गुन्हा दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा कुणाच्या तरी सांगण्या वरून करण्यात आला आहे असा आम्हाला संशय आहे. यामुळे परिसरात संतापाची लाट आहे.
– औदुंबरराजे भोसले , माजी सरपंच, नेरले