११ वर्षांनंतर दिलासा — माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह ७ जणांची निर्दोष मुक्तता

करमाळा : २०१४ च्या करमाळा विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे वाटल्याच्या प्रकरणात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह सात जणांना अखेर ११ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर निर्दोष मुक्तता मिळाली आहे.

प्रकरणानुसार, भाळवणी शिवारातील साई धाब्याजवळ ६ जणांकडे प्रचार साहित्य, मतदार याद्या, मुखवटे व रोख रक्कम आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पोलिसांच्या फिर्यादीत हे कृत्य शिंदे यांच्या सांगण्यावरून झाले असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर आरोपींवर जिल्हाधिकारी आदेशभंग व मतदारांना पैशाचे आमिष दाखवण्याचे आरोप ठेवून खटला दाखल झाला.

एपीआय ए. एस. माने यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी दिवाणी न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाने १२ साक्षीदार तपासले; मात्र आरोपींचे वकील ॲड. प्रमोद जाधव व ॲड.सुनील रोकडे यांनी हा खटला राजकीय दबावातून घडवलेला असून, प्रत्यक्ष घटनेशी आरोपींचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाने सरकार पक्षाकडून आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. निकालानंतर करमाळा तालुक्यातील शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
