३२ वर्षांनंतर पुन्हा मिळाला विद्यार्थी जीवनाचा अनुभव!

केम (प्रतिनिधी /संजय जाधव): केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूल येथे इयत्ता दहावी सन १९९२-९३ च्या बॅचचा तब्बल ३२ वर्षांनंतरचा स्नेहमेळावा उत्साह, आनंद आणि जुन्या आठवणींच्या भावनेत पार पडला. या कार्यक्रमास केम, वडशिवणे, सातोली, मलवडी, भोगेवाडी, रोपळे आदी परिसरांतील सुमारे ६० ते ७० माजी विद्यार्थी उपस्थित राहिले.

२५ ऑक्टोबर रोजी सकाळी श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे सर्व विद्यार्थी एकत्र जमले. देवाची पूजा करून वाजतगाजत शाळेकडे प्रस्थान झाले. शाळेत पोहोचल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली, ज्यामध्ये सुमारे ७० ते ८० झाडे लावण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थी रांगेत उभे राहून श्री दोंड सरांकडून एका छडीने आनंदाने प्रतीकात्मक “शिक्षा” घेत जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. त्या क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आठवणींची लहर होती.

कार्यक्रमासाठी श्री चंद्रकांत दोंड सर, दत्तात्रय तळेकर , कैलास सुरवसे सर, दत्तात्रय कारंडे सर, बनसोडे – शिंदे मॅडम हे माजी शिक्षक त्याचप्रमाणे श्री उत्तरेश्वर मा.विद्यालयाचे प्रा.साळुंखे तसेच नारायण देवकर,बलभिम बिचितकर व बळीराम बोंगाणे (माजी सेवक)हे उपस्थित होते.
यानंतर शाळेची घंटा वाजवून पारंपरिक पद्धतीने प्रार्थना व राष्ट्रगीत घेण्यात आले. या प्रसंगाने सर्वांनाच पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनात परतल्याचा अनुभव दिला.

बॅचच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला इयत्ता नववी, दहावी व अकरावीच्या पाठ्यपुस्तकांचे प्रत्येकी १० संच देऊन “बुक बँक” उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
माजी शिक्षक श्री दोंड सर, श्री कारंडे सर आणि शिंदे मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये, कृतज्ञता आणि समाजसेवेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे संकल्पक श्री दत्तात्रेय कुलकर्णी यांनी सर्वांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावली. शेवटी श्री प्रशांत रायचूरे यांनी सर्वांचे आभार मानले. “माहेरची पैठणी संगीत खुर्ची” या मनोरंजक खेळांनी कार्यक्रमाला रंगत आणली.

हा स्नेहमेळावा सर्वांसाठी आठवणींचा खजिना, बालपणाचा पुनःअनुभव आणि एकतेचा सण ठरला. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री गोविंद जगदाळे सर यांनी केली, तर सूत्रसंचालन श्री विजय काळे सर आणि सौ. पल्लवी तळेकर यांनी केले.



 
                       
                      