ऊस उत्पादक संतप्त ! – कारखान्यांनी तात्काळ बिले द्यावीत – अन्यथा शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तालुक्यातील मकाई व श्री कमलाई साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊसाची बिले गेल्या नऊ महिन्यापासून दिली नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. एवढेच नाहीतर पैशाअभावी आत्महत्या करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. असे असताना कारखानदार मात्र सुस्त आहेत. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा आता अंत संपला असून, शेतकऱ्यांचा दसरा – दिवाळी सण गोड करा.. अन्यथा उद्रेकाला सामोरे जावे लागेल: अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
मकाई व कमलाई शुगर या कारखान्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांची ऊसाची बिले थकीत आहेत. या बिलावर शेतकरी वारंवार आंदोलने व रास्ता रोको करीत आहेत, परंतु कारखानदारांना काही घाम फुटत नाही. कमलाई कारखान्याने बऱ्यापैकी बिले दिलेली असून अजून काही बिले देणे बाकी आहेत. मकाई कारखान्याकडे ९० टक्के शेतकऱ्यांची बिले अद्याप येणे आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम १ डिसेंबर पासून सुरू होत आहे. तरी अद्याप मकाई कारखान्याने पहिल्या हप्ता सुध्दा दिलेला नाही. ज्या शेतकऱ्यांचे जीवन निव्वळ शेतीवर अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांची आज काय अवस्था असेल.. हे सांगण्याची गरज नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरातील लग्नं तसेच आजारपणालाही कारखानदारांनी ५० हजार रूपयाची रक्कम मागून देखील दिलेली नाही. एवढेच नाहीतर दवाखान्यासारख्या संवेदनशील कामासाठीही कारखान्याने शेतकऱ्यांची आर्थिक मदत केलेली नाही.
त्यामुळे अनेकांना व्याजाने पैसे काढून दवाखान्याचा खर्च भागावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च, खताचा खर्च, मशागतीचा खर्च यामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. ऊसाचे पैसे मिळाल्याशिवाय त्यांचेपुढे आता कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सहन करण्याची क्षमता आता संपली असून आठ दिवस, महिना करीत करीत नऊ महिने झालेतरी शेतकरी अजून ऊसाचे बिल मिळेल म्हणून आशा बाळगून बसला आहे. परंतु कारखानदारांनी दिलेला शब्द अजुन कधी सत्यात उतरेल हे सांगता येत नाही. कारखानदारांनी शेतकऱ्यांचा विश्वास गमावला असून, त्यांनी आता शेतकऱ्यांची जास्त परीक्षा न घेता तात्काळ बिले काढावीत अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.