शेतकऱ्यांच्या खिशात ‘शेती मार्गदर्शन’- “महाविस्तार” ए आय ॲप शेतकऱ्यांच्या सेवेत..

करमाळा संदेश प्रतिनिधी :
शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीतील अडचणी, कीडरोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील सततचे बदल आणि बाजारभावातील चढ-उतार यांचा नेहमीच सामना करावा लागतो. यामध्ये अनेकदा वेळेवर योग्य सल्ला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होते. या समस्येवर तोडगा म्हणून कृषी विभागाने आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘महाविस्तार’ हे ॲप शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध करून दिले आहे.

पेरणीपासून विक्रीपर्यंत सर्व माहिती
महाविस्तार ॲप शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची डिजिटल कुंडली ठरणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पिकांची पेरणी, उगवण, वाढ, रोगराई, कीड व्यवस्थापन, मृदा आरोग्य, खतांचा संतुलित वापर, पीक व्यवस्थापन, गोदाम व्यवस्थापन तसेच शेतीमाल विक्रीपर्यंतची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एवढेच नव्हे तर हवामानातील बदलांची पूर्वसूचना, जमिनीच्या दर्जानुसार लागवड पद्धती आणि बाजारभावाची माहिती सुद्धा यात दिली जाणार आहे.

अशा पद्धतीने करा ॲपचा वापर
हे ॲप गूगल प्ले स्टोअरमध्ये ‘MahaVISTAAR_AI’ या नावाने उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून आपला फार्मर आयडी नोंदवणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर शेतकरी या ॲपचा वापर करू शकतील. यामुळे शेतकऱ्यांना संवादात्मक पद्धतीने प्रश्न विचारून तात्काळ सल्ला मिळणार आहे.

अचूक सल्ल्यामुळे उत्पादनवाढ
या ॲपचा वापर करून शेतकऱ्यांना हवामान, रोगराई व बाजारभावासंबंधीचे तात्काळ मार्गदर्शन मिळेल. अचूक व योग्य वेळी मिळालेल्या सल्ल्यामुळे शेतीतील उत्पादनवाढ होणार असून, शेतकरी अधिक नियोजनबद्ध व स्मार्ट पद्धतीने शेती करू शकतील. त्यामुळे शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी हे ॲप एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

कृषी विभागाचा प्रयत्न
या ॲपचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी याचा वापर केल्यास केवळ उत्पादनात वाढ होणार नाही तर शेतीसंबंधी वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
अधिकारी काय म्हणतात?
“महाविस्तार ॲपमुळे शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन मिळणार आहेच शिवाय यामध्ये चॅट बॉटचा वापर केल्यास संवादात्मक सल्ला देखील मिळणार आहे. यामध्ये हवामान आणि शेतीसंबंधी प्रश्न विचारताच तात्काळ मार्गदर्शन याचा फायदा उत्पादन वाढीसाठी होणार आहे.”
– राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी, करमाळा
