शेलगाव-वांगी येथे केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी लवकरच समिती स्थापन करणार - कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे - Saptahik Sandesh

शेलगाव-वांगी येथे केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी लवकरच समिती स्थापन करणार – कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे

करमाळा (संदेश प्रतिनिधी) –  करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने (शेलगाव-वांगी येथील) महत्वाचे समजले जाणारे केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी लवकरच समिती स्थापन केली जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेलगाव वा येथील संत वामनभाऊ भगवान बाबा यांच्या मंदिरासमोरील सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

शेलगाव वा. येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजयमामा शिंदे होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, सामाजिक कार्यकर्ते सुजीत बागल, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, भोसेचे सरपंच भोजराज सुरवसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नीलकंठ देशमुख, अनिल केकान, दत्तात्रय पोटे, विलास पाटील, चंद्रहास निमगिरे आदी मंचावर उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाले, शेलगाव वा येथे केळी संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिनी केली आहे. जिल्ह्यात उत्पादीत होणाऱ्या केळीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथे केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी लवकरच समिती तयार केली जाईल. याशिवाय पीक विम्यामध्ये केळीचा समावेश केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करमाळा मतदार संघात विकास केला जात आहे. जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होत असल्याने केळी संशोधन केंद्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावा. तालुक्यात रावगाव, भोसेसह परिसरातील काही गावात विहिरी खोदण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. ते निर्बंध उठवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायचंद खाडे, राजाभाऊ बेरे, हिरालाल कोंडलकर, तात्या खाडे, नागनाथ पोटे, शशिकांत केकान, अजित केकान, प्रताप खाडे, विजय पोटे, सोमनाथ पोटे, लक्ष्मण कोंडलकर, नागनाथ केकान, रामभाऊ खाडे, बाळासाहेब खाडे, शिवाजी पोटे, शंकर पोटे, योगेश केकान, संतोष केकान, शंकर केकान, अतुल केकान, गणेश पोटे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विलास दोलतोंडे यांनी केले. प्रास्ताविक कृषी अधिकारी शेषराव डोळे यांनी तर आभार गोरख खाडे महाराज यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!