डॉ. बाबा आढाव : सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्योती- हमाल पंचायततर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.११: राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, तळागाळातल्या जनतेचा नेता, श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवलेला समाजसाधक, सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्योती म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबा आढाव आपल्यातून जाणे म्हणजे लाखो कामगारांचा आधारस्तंभ कोसळला आहे. या शब्दात तालुका हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी श्रध्दांजली आर्पण केली.

करमाळा हमाल भवन येथे डॉ. आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात कृतज्ञता होती. डॉ. आढाव यांनी एक साधी वाट नव्हे, तर बदलाची, न्यायाची आणि मानवी प्रतिष्ठेची वाट चालली.
ॲड. राहुल सावंत पुढे बोलताना म्हणाले, की
“डॉ.बाबा आढाव हे अन्यायाच्या अंधारात उभा राहिलेला एक तेजस्वी दिवा होते. ते मोठे डॉक्टर होऊ शकले असते, सुखात आयुष्य व्यतीत करू शकले असते; पण भुकेल्यांच्या हाका, कामगारांच्या यातना, उपेक्षितांच्या अश्रूंनी त्यांचा मार्ग बदलला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रमिकांच्या लढ्यासाठी वाहिले.”त्यांच्या प्रयत्नांमुळे पुण्यातील हमाल, तोलार, फेरीवाले, रिक्षाचालक, टेम्पोचालक, कचरा वेचणारे, वजनदार मजूर—अशा हजारो मेहनतकऱ्यांना मानाने व सुरक्षितपणे जगण्याचा हक्क मिळाला. बाबांनी केवळ संघटना उभारली नाही, तर कामगारांच्या मनात “आपणही माणूस आहोत” हा विस्मृतीत गेलेला आत्मसन्मान पुन्हा जागवला.

कार्यक्रमात भिमराव लोंढे व दीपक उबाळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करून बाबांच्या कार्याची उजळणी केली.
यावेळी करमाळा तालुका हमाल पंचायतचे सदस्य आणि अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


