अक्षय काळे यांची एमपीएससी मधून सहाव्या पदाला गवसणी – राज्य कर सहाय्यक आयुक्तपदी निवड

करमाळा : मूळचे करमाळा येथील व सध्या परांडा येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अक्षय ईश्वर काळे यांची; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2024 च्या परीक्षेत 100 वा क्रमांक मिळवत सहाय्यक आयुक्त, राज्य कर (Assistant Commissioner of State Tax – Class 1) या पदावर निवड झाली आहे. एमपीएससीद्वारे मिळवलेले हे त्यांचे सहावे पद ठरले आहे.

याआधी त्यांनी दोन वेळा मंत्रालयात सहाय्यक कक्ष प्रमुख, दोन वेळा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर (STI) तसेच एकदा गटविकास अधिकारी (BDO) अशी पाच पदे मिळवली होती.
करमाळा हे अक्षय काळे यांचे मूळ गाव असून सध्या त्यांचा परिवार सूर्डी (ता. बार्शी) येथे स्थायिक आहे. त्यांचे वडील ईश्वर काळे हे महावितरणमध्ये प्रिन्सिपल ऑपरेटर म्हणून माढा येथे कार्यरत आहेत. करमाळा येथील शिवसेनेते माजी शहरप्रमुख राजाभाऊ काळे यांचे ते पुतणे आहेत.

अक्षय काळे यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, करमाळा व दिलीपराव सोपल विद्यालय, बार्शी येथे पूर्ण केले असून पुढील शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अॅण्ड सायन्स, सोलापूर येथे घेतले आहे. त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे.
एमपीएससीच्या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविणे हे सोपे काम नाही. अनेक जण वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही इच्छित पद मिळवू शकत नाहीत आणि शेवटी इतर करिअरचा मार्ग स्वीकारावा लागतो. मात्र, योग्य नियोजन, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर अशक्य काहीच नाही, हे अक्षय काळे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. सतत प्रयत्न आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी एमपीएससीतून एक-दोन नव्हे तर तब्बल सहा पदे मिळवत, इच्छित पद मिळविण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले आहे.

अक्षय काळे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. करमाळा येथील विठ्ठल सावंत, राहुल सावंत, संजय सावंत, सुनील सावंत यांच्यासह अनेकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.



