केम-पोथरे–जातेगाव येथील तलावाच्या कामावर भ्रष्टाचाराचे आरोप – १६ डिसेंबरला पुण्यात प्रहारचे अर्धनग्न आंदोलन

केम(संजय जाधव):करमाळा तालुक्यातील केम, पोथरे व जातेगाव येथील रूपांतरित साठवण तलावाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने १६ डिसेंबर रोजी पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख संदीप तळेकर यांनी दिली.

या आंदोलनात महिला व शेतकरी सहभागी होणार असून, संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन तसेच हालगी नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात संदीप तळेकर यांनी म्हटले आहे की, केम येथील रूपांतरित साठवण तलाव योजनेसाठी २.९४ कोटी रुपयांचे दायित्व मंजूर करण्यात आले आहे. मात्र या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे तसेच धरणाला ग्राउटिंग न करता दायित्व मंजूर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात २२ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदार शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांचे कोणतेही देयक अदा करू नये, अशी मागणीही करण्यात आली होती.

या तक्रारीनंतर प्रादेशिक जलसंधारण अधिकारी (दक्षता व गुणनियंत्रण), पुणे यांच्यामार्फत चौकशी करण्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे ७ नोव्हेंबर रोजी नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र, जवळपास २० दिवस उलटूनही प्रत्यक्ष चौकशी न झाल्याने प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या मते, कंत्राटदाराने न केलेल्या कामांची बिले मंजूर करण्याची तयारी सुरू असून, संबंधित अधिकारी कंत्राटदारास पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्ष भ्रष्टाचाराविरोधात लढणारी संघटना असून, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अहोरात्र संघर्ष करणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास १६ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

