तहसील कार्यालयाकडून पक्षपात झाल्याचा आरोप करत वडशिवणेमधील काळेंनी दिला उपोषणाचा इशारा
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – वडशिवणे(ता.करमाळा) येथील सुहास मधुकर काळे यांनी आपल्या शेतातून गेलेल्या रस्त्याच्या प्रकरणात करमाळा तहसील कार्यालयाकडून पक्षपात झाल्याचा आरोप केला आहे. या विषयी चौकशी करून मला न्याय मिळावा अन्यथा येत्या सोमवार (दि.२४ एप्रिल) पासून कुटूंबासहित सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले कि मी वडशिवणे तालुका करमाळा येथील रहिवासी असून मी गट नं ६४/२ येथे सन २००१ सालापासून वास्तव्यास आहे. तेंव्हापासून आजपावेतो त्या ठिकाणाहून कुणाचाही रस्ता नव्हता. २०१३ साली रस्त्याविषयी प्रकरण तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांनी या रस्त्याविषयी आदेश देत गट नं 68 च्या उत्तर बांधावरून 5 फूट व गट नं 64/2च्या दक्षिण बांधावरून 5 फूट असा सामायिक रस्ता करावा असा आदेश दिला. व या आदेशामध्ये गट नं 64/1 मधला अडथळा दूर करण्यात यावा असे त्या आदेशात म्हटले.
असे असताना देखील केमचे मंडल अधिकारी यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता दि.२१ मार्च २०२३ रोजी अचानक पोलीस बंदोबस्तात येऊन २०१३ चा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश बाजूला ठेवून केवळ गट नं 64/2 या आमच्या गटातून १२ फुटाचा नवीनच रस्ता तयार केला आहे. यामध्ये आमच्या उभ्या पिकाला पाणी देण्याचा पाट देखील मोडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आम्हला पिकाला पाणी देता येत नाही. आमच्या पिकाचे नुकसान होऊ लागले आहे. या घटनेची चौकशी करून योग्य तो न्याय मिळावा यासाठी तहसीलदार करमाळा यांच्याकडे दि.२१ मार्च २०२३ रोजी रीतसर तक्रारी अर्ज केला त्यांनतर दि.२४ मार्च २०२३ रोजी उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले. निवेदनात दि. ५ एप्रिल २०२३ रोजी उपोषण करणार असल्याचे सांगितले होते. परंतु दि.५ एप्रिल २०२३ पर्यंत मला कोणत्याही प्रकारचे अपेक्षित उत्तर मिळाले नाही.
मी ५ एप्रिलला उपोषणाला बसलो असता अचानक उपोषणस्थळी सकाळी 11.00वाजता कोतवालामार्फत तहसीलकार्यालयातून निघालेली एक नोटीस देण्यात आली. त्यात ३१ मार्च २०२३ रोजीच्या मंडळ अधिकारी, केम यांच्या अहवालाचे अवलोकन केले असता आमच्या अधिकाऱ्याने केलेली कार्यवाही योग्य आहे त्यामुळे आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे असे तहसीलदार करमाळा यांच्याकडून सांगण्यात आले.
वास्तविक तहसीलदार यांनी घटना स्थळाची पाहणी करून निर्णय देणे अपेक्षित होते परंतू त्यांनी तसे न करता आमच्यावर अन्याय केला आहे. सदर घटनेनंतर मी ३१ मार्च २०२३ रोजीचा मंडळ अधिकारी केम यांचा अहवाल काय आहे हे जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयात रीतसर नकलेचा अर्ज दिला व माहिती अधिकारामध्ये माहिती मागण्यासाठी अर्ज केला. हा अर्ज करून २० दिवस होऊन गेले तरी देखील मला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. यासंबधी विचारणा केली असता तहसीलकार्यालयाकडून मला उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत व मंडळ अधिकारी यांचा अहवाल आमच्याकडे अजून जमा नाही असे सांगितले जात आहे.
जर मंडळ अधिकारी यांनी अजून तहसीलकार्यालयात अहवालजमा केला नाही तर तहसीलदार साहेबांनी कोणत्या अहवालाचे अवलोकन करून माझा उपोषण अर्ज निकालात काढला हा पण एक प्रश्नच आहे सदर सर्व घटनेची चौकशी करून योग्य तो न्याय न मिळाल्यास मी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२४ एप्रिल २०२३ पासून सहकुटुंब आमरण उपोषण करणार आहे.
या प्रकरणात केम मंडल अधिकारी श्री घुगे यांच्याकडे प्रतिनिधीने विचारणा केली असता ते म्हणाले तहसीलदार यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या आदेशानुसार आम्ही २१ मार्च २०२३ रोजी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला केला.