स्नेहालय स्कूलच्या वतीने पूरग्रस्तांना साहित्य वाटप

केम(संजय जाधव) :श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचलित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल, रोशेवाडी यांच्या वतीने पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सीना नदीला आलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटुंबे मोठ्या संकटात सापडली आहेत. त्यांची ही गरज ओळखून संस्थेने ‘एक हात मदतीचा’ या भावनेतून पुढाकार घेतला. संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि वाहनचालक यांच्या योगदानातून उत्तम दर्जाचे जीवनावश्यक साहित्य जमा करून गरजूंना पोहोचविण्यात आले.

स्नेहालय स्कूलच्या वतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे मदत साहित्य सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी अमित कदम, संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी यांच्या सहकार्याने मदत साहित्याचे वितरण करण्यात आले. पूरग्रस्त बांधवांना वेळोवेळी अशा स्वरूपाची मदत मिळाल्यास त्यांना उभारी मिळेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




