पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेसला जेऊर येथे थांबा द्यावा – अमरजित साळुंके यांची मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर डिव्हिजन अंतर्गत जेऊर रेल्वे स्टेशन येथे सोलापूर -पुणे इंटरसिटी 12157-12158 या गाडीचा थांबा मिळावा अशी मागणी भाजपा चे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुर्डुवाडी येथे वंदे भारत मुंबई – सोलापूर या एक्सप्रेस च्या स्वागत प्रसंगी आ.मोहिते पाटील आले होते, यावेळी सोलापूर जि.प. चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी सरपंच अजित तळेकर उपस्थीत होते.
हुतात्मा इंटरसिटी ही गाडी जेऊर येथे पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी 8 वाजता व रात्री जेऊर येथे 8 वाजता ही वेळ करमाळा तालुक्यातील व परिसरातील प्रवाशांच्या अत्यंत सोईची आहे.
ही गाडी इंद्रायनी गाडी प्रमाणेच फक्त बसून प्रवास करता येणारी आहे, या गाडीत स्लीपर कोच नाहीत, त्यामुळे ही हुतात्मा इंटरसिटी गाडी प्रवाशांसाठी सोईस्कर आहे.
विशेष म्हणजे हुतात्मा एक्सप्रेस ही सोलापूर डिव्हीजनची आपल्या हक्काची गाडी आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेता हुतात्मा एक्सप्रेस या गाडीचा थांबा जेऊर येथे मिळावा अशी मागणी श्री साळुंके यांनी या निवेदनात केली आहे.
याप्रसंगी कुर्डुवाडी रेल्वस्थानक येथे डॉ.अमोल घाडगे, तात्यासाहेब गोडगे, भाजप करमाळा शहर अध्यक्ष जगदीश अगरवाल, सुदर्शन तळेकर, शाम सिंधी, नरेंद्रसिंह ठाकुर, सचिन चव्हाण, काकासो दगडे, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.