केममध्ये भव्य मिरवणुकीने आंबेडकर जयंती साजरी

केम(संजय जाधव) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४३ वी जयंती केम येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सजविलेल्या बग्गीमध्ये आठ फूट उंचीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा आणि भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती.

मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वाद्यांसह महाराष्ट्रातील प्रसिद्ध चाउस बॅण्ड आणि धाराशिव येथील झंकार बॅण्ड यांचा समावेश होता. या दोन्ही बॅण्डच्या सुमधुर वादनाने भीम अनुयायी मंत्रमुग्ध झाले होते.

नागरिकांनीही या बॅण्ड्सना भरभरून प्रतिसाद दिला. मिरवणूक पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. एलईडी छत्र्यांची सजावट आणि विविध आकर्षक डेकोरेशनने संपूर्ण गाव उजळून निघाले. “डॉ. बाबासाहेब अमर रहे” च्या घोषणांनी केम गाव दुमदुमून गेले होते.

या मिरवणुकीचे यशस्वी आयोजन ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती’ आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे शक्य झाले.




