छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून शेटफळ येथे प्रशासन व ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.26) : शेटफळ ना.(ता.करमाळा) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे. हा पुतळा अनाधिकृत असून पुतळा उभा करण्यासाठी शासनाची परवानगी घेतली नसल्याने हा पुतळा हटवण्यात यावा असा आदेश शासनाच्यावतीने देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी आक्रमक पविञा घेत पुतळा काढण्यास विरोधात केला आहे, मात्र प्रशासन त्यांच्या भूमिकेवरती ठाम असून, ग्रामस्थ पुतळा हटू देणार नाही, या भूमिकेवरती ठाम आहेत, त्यामुळे शेटफळ (ना) येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलीस संरक्षण ठेवण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास आमचा विरोध नाही .मात्र हा पुतळा बसवण्यासाठीच्या प्रशासकीय बाबीची पूर्तता करावी अशी भूमिका प्रशासनाची आहे.तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेली वीस वर्षापासून आमच्या गावात आहे.त्यामुळे हा पुतळा आम्ही हटवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांची आहे त्यामुळे ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेटफळ (ना) येथे अर्ध पुतळा गेली वीस वर्षांपासून उभा होता, मात्र काही कारणास्तव हा पुतळा खराब झाल्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येवुन सर्व समाजाला बरोबर घेऊन अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. मात्र परवानगीशिवाय हा पुतळा उभारला असल्याने पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी शेटफळ ग्रामस्थांना हा पुतळा काढण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत प्रांतधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विजयकुमार जाधव व पोलिस प्रशासन यांनी २४ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भेट देऊन पुतळा काढण्यासंदर्भात सरपंच व ग्रामस्थांना सुचना केल्या आहेत.
शेटफळ गावातील नागोबा मंदिर संस्थांच्या जागेत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गेली वीस वर्षापासून पुतळा आहे. त्यामुळे यापूर्वी शासनाने कुठल्याही प्रकारचे विचारणा केली नाही आणि आत्ता शासनाने याबाबत पत्रव्यवहार सुरू केला असून पुतळा काढण्याबाबत आदेश दिले आहेत, यावर ग्रामस्थांनी हा पुतळा आम्ही हटवणार नाही अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे शेटफळ ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली वीस वर्षांपासून या जागी पुतळा होता त्याच जागी युवकांनी पुतळा उभा केला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबत गावातील कोणाचीही तक्रार नाही, असे असताना प्रशासन करत असलेली कारवाई गावकऱ्यांना मान्य नाही, भावनेचा विचार करून प्रशासनाने तोडगा काढावा.
– विकास संदिपान गुंड, (सरपंच, शेटफळ ना.)
याबाबत काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर वस्तुस्थितीचा मेल केलेला आहे, मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य ते सूचना प्रशासनाला येऊन सर्व शिवभक्तांच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने पुतळाकाढण्याची भूमिका बदलावी.
– महेश चिवटे, (जिल्हाप्रमुख, शिवसेना)





