वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून शस्त्राच्या धाकावर दागिन्यांची लूट; साडे परिसरात दहशत

करमाळा,ता.19: गोमे वस्ती (साडे) येथे 12 ऑक्टोबर च्या मध्यरात्री घरफोडी करून पाच जणांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत सोने व रोख रक्कमेसह सुमारे २ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रघुनाथ शिवाजी गोमे (वय 80) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले, की मी व माझी पत्नी लक्ष्मीबाई असे आम्ही दोघेच घरी राहतो. माझी मुले कामानिमित्त मुंबईत वास्तव्याला आहेत. दि. 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते पावणेबारा दरम्यान पाच अज्ञात व्यक्तींनी (तोंडाला कापडं बांधलेले) बेडरूमचा दरवाजा उघडून घरात घुसले. सर्वांच्या हातात लाकडी काठ्या होत्या. दोन आरोपींनी आम्हा दोघांच्या डोक्यावर, हातावर व पाठीवर मारहाण केली. एका आरोपीने सुरीचा धाक दाखवत आवाज केल्यास जीव घेण्याची धमकी दिली.

दरम्यान, उर्वरित दोघांनी बेडरूममधील कपाट फोडून सोन्याचे दागिने व रोकड शोधली. त्यांनी लक्ष्मीबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील फुले, झुंबे व वेल जबरदस्तीने काढून घेतले. कानातले ओढताना त्यांच्या डाव्या कानाला पातळी फाटून रक्तस्राव झाला.

चोरीस गेलेला ऐवज पुढीलप्रमाणे – ₹70,000 रोकड ,सोनेरी मणी मंगळसूत्र – १० ग्रॅम (किंमत ₹70,000,कानातील फुले/झुंबे – ८ ग्रॅम किंमत ₹56,000, सोन्याचे वेल (किंमत ₹35,000) एकूण किंमत – ₹2,31,000

प्रसंगादरम्यान दोन आरोपींनी मोबाईलची लाईट लावून चोरी केली. बाहेर आणखी काही साथीदार असल्याची शंका व्यक्त केली आहे. आरोपी पळून गेल्यानंतर गोमे यांनी मुलांना व नातेवाईकांना फोन केला. चुलत भाऊ शाहाजी गोमे व गणेश गोमे यांनी येऊन घराची कडी उघडून त्यांना बाहेर काढले आणि तत्काळ करमाळा येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

वैद्यकीय तपासणीत रघुनाथ गोमे व लक्ष्मीबाई यांचा डावा हात मोडल्याचे आढळले. तसेच बहीण छगाबाई विष्णु घाडगे यांच्या घरीही चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


 
                       
                      