स्व. शिवाजी तळेकर यांच्या पुण्यस्मरणार्थ केम येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न
करमाळा (दि.१२) – केम येथील महात्मा फुले शिक्षण व विकास मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, करमाळा खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन स्व. शिवाजी (बापू) तळेकर यांच्या १० सप्टेंबर रोजी असलेल्या तृतीय पुण्यस्मरणार्थ केम येथे नेत्र तपासणी शिबीर, कीर्तन कार्यक्रम व चित्रकला स्पर्धा आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कै. शिवाजी बापू तळेकर यांच्या पुतळ्यास ह.भ.प. गणेश महाराज खेडकर महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. गणेश महाराज खेडकर यांचे कीर्तन संपन्न झाले. या कीर्तन सोहळ्याला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. शिवाजी (बापू) तळेकर यांच्या तृतीय पुण्यसमरणार्थ भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत राजाभाऊ तळेकर विद्यालयात, केम येथे आयोजित करण्यात आले. पुणे येथील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर आयोजित केले गेले. या शिबिरात सर्व वयोगटातील 250 पेक्षा जास्त व्यक्तींची मोफत नेत्र तपासणी केली गेली. तसेच चष्म्याचा नंबर आलेल्या 197 व्यक्तींना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरात तपासणी केलेल्या 78 मोतीबिंदू असलेल्या व्यक्तींना पुण्यातील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ह्या शिबिरात डॉ.जितेश खरात व त्यांची टीम यांचे सहकार्य लाभले.
स्व. शिवाजी बापू तळेकर यांचे तृतीय पुण्यस्मरणार्थ भव्य चित्रकला स्पर्धा शुक्रवार दि.०६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वा राजाभाऊ तळेकर विद्यालय, केम येथे आयोजित केली गेली होती. या चित्रकला स्पर्धामध्ये केम पंचकृषितील विद्यालयातील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी लागणारे रंग व इतर सर्व साहित्य मोफत देण्यात आले तसेच प्राथमिक गट-1 ली ते 4 थी,लहान गट-5 वी ते 8 वी,मोठा गट-9 वी ते 12 वी गटातील एकूण 18 विजेत्यांना माजी आमदार शामलताई बागल, विलासराव घुमरे,तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
केम येथील तळेकर विद्यालयात भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महात्मा फुले शिक्षण व विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष महेश तळेकर, सचिव मनोज तळेकर,सर्व ग्रामस्थ पदाधिकारी,मान्यवर राजाभाऊ तळेकर विद्यालय, केम चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.