आनंद दास यांनी लोकसेवेस प्राधान्य द्यावे – माजी आमदार नारायण पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : प्रशासन लोकाभिमुख असेल तरच विकासकामे करणे लोकप्रतिनिधींना सहज शक्य होते, आनंद दास यांनी लोकसेवेस प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आज माजी आमदार नारायण पाटील यांनी एका सत्कार कार्यक्रमात व्यक्त केली.
साडे (ता.करमाळा) येथील मुळ रहिवासी आनंद विकास दास यांची नूकतीच प्रशासकीय सेवेत सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. आगामी काळात कदाचित मुंबई येथील मंत्रालयात एका विभागाचा कारभार ते सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून पाहणार आहेत. अथवा विभागीय किंवा जिल्हास्तरीय कार्यालयाचाही पदभार त्यांना दिला जाऊ शकतो. त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते जेऊर ता.करमाळा येथील त्यांच्या कार्यालयात आनंद दास यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, विद्यमान पंचायत समिती सदस्य तथा साडे गावचे माजी सरपंच दत्तात्रय जाधव, बंडू नेमाने, नवनाथ दास सर, मा. उपसरपंच बाळासाहेब पाटील, उसरपंच,सतीश घाडगे, नागेश लाळगे, आदी उपस्थित होते.यावेळी प्रतिक्रिया देताना पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील सुशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी जिद्द व चिकाटीने शिक्षण घेत असून बहुतांश प्रमाणात आज मंत्रालयात, विभागीय सचिवालय, शासनाची जिल्हा स्तरावरील कार्यालये, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर करमाळा तालुक्यातील तरुण सेवेत रुजू झाले आहेत.
याचा फायदा करमाळा मतदार संघातील विकासकामांसाठी होत असून जनतेसाठी ही जमेची बाजू आहे. आनंद दास यांनी सुद्धा जनतेच्या अडचणी सोडवण्यासंबंधी प्रश्नांची तातडीने कार्यवाही करुन जनतेच्या हिताच्या फाईल्स लाल फितीत अडकल्या जाणार नाहीत याची भविष्यात दक्षता घ्यावी अशी अपेक्षा माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेऊर ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांनी केले तर आभार स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील यांनी मानले.