मांगी येथील प्रगती विद्यालयात आनंदमेळा उत्साहात संपन्न

करमाळा:स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच मांगी गावचे सुपुत्र युवा नेते दिग्विजय दिगंबर बागल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल (दिनांक १२ जानेवारी) मांगी येथील प्रगती विद्यालयात आनंदमेळा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या आनंदमेळाव्याचे उद्घाटन सौ. शीला प्रवीण अवचर व सौ. नूतन बागल यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात प्रगती विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
महिलांचा आवडता सण मकर संक्रांती निमित्त लागणारे वाणाचे साहित्यही या आनंदमेळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे मांगी गावातील अनेक महिलांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे, या उद्देशाने विविध खाऊचे व बाजाराचे स्टॉल लावण्यात आले होते. यासाठी प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुपमा देवकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सुनील बागल, अशोक गवळी, स्वप्निल पाटील, पप्पू शेठ देशमाने यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या आनंदमेळा बाजाराला भेट देऊन खरेदी केली.


