पोथरे-निलज ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंकूश शिंदे यांची बिनविरोध निवड.. - Saptahik Sandesh

पोथरे-निलज ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंकूश शिंदे यांची बिनविरोध निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा (ता.१२) : पोथरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी उपसरपंच अंकूश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापुर्वी बागल-पाटील युतीतील सरपंच धनंजय झिंजाडे यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या रिक्तपदी आज निवडणूक घेण्यात आली.

सरपंच निवडणुकीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी विनोद बनसोडे हे होते. तसेच सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी हरीभाऊ दरवडे तसेच गाव कामागार तलाठी सोमनाथ खराडे व एच.बी.शेंगळे हे होते. पोथरे-निलज ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. १३ जागेसाठी पूर्वी निवडणुक झाली होती. त्यामध्ये बागल गटाचे सात, पाटील गटाचे दोन, जगताप गटाचे दोन तर विद्यमान आमदार शिंदे गटाचे दोन सदस्य निवडून आले होते.

त्यानंतर पाटील-बागल युतीचे धनंजय झिंजाडे हे सुरवातीला सरपंच झाले होते. युतीत ठरल्यानुसार श्री.झिंजाडे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक आज जाहीर झाली होती. त्यानुसार सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये सरपंचपदासाठी श्री.शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दुपारी २ वाजता निवडणुक निर्णय अधिकारी श्री. बनसोडे यांनी श्री.शिंदे बिनविरोध निवडल्याचे जाहीर केले.

निवड झाल्यानंतर नुतन सरपंच अंकुश शिंदे यांनी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले तसेच आपण जे सरपंचपद दिले, त्या पदाला योग्य न्याय देवून गावाचा विकास करू असे सांगितले. यावेळी सदस्य म्हणून मावळते सरपंच धनंजय झिंजाडे, उपसरपंच दिपाली जाधव, सदस्य सुनिता विशाल झिंजाडे, दिपाली शांतीलाल झिंजाडे, जनाबाई पाराजी शिंदे, रेखा आदिनाथ झिंजाडे, राणी दत्तात्रय काळे, विठ्ठल नारायण शिंदे, रघुवीर बबन जाधव, संतोष पोपट ठोंबरे, सुनिता अनिल गायकवाड (निलज) व संजय जाधव (निलज)हे सदस्य उपस्थित होते. तसेच सर्व गटाचे मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते. या निवडीनंतर सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने नुतन सरपंच श्री.शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुलालाची व फटाक्याची आताषवाजी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!