सोलापूर विद्यापीठाच्या योग स्पर्धेत व्हायसीएमची अनुराधा राऊत प्रथम

करमाळा : करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनुराधा पंकज राऊत हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन योग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ही स्पर्धा दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा येथे रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली. या स्पर्धेमध्ये विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांतील ४२ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अनुराधा राऊत हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकासह ‘स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू’ हा मानही मिळवला.

अनुराधा ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बी.एस्सी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असून तिला शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. रामकुमार काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनुराधाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





 
                       
                      