मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रिया ऑनलाईन व पूर्णपणे मोफत – गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन
केम (प्रतिनिधी संजय जाधव) – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना आता मंत्रालयात जाण्याची गरज नसून, ही प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन आहे. तसेच वैद्यकीय मदत मिळविण्याकरीता कोणालाही एक रुपयाही द्यायची आवशकता नसून, ही पूर्ण प्रक्रिया मोफत आहे. अशी माहिती वैद्यकीय सहाय्यक गणेश चव्हाण यांनी दिली.
या योजनेमध्ये रुग्णालयांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जात आहे. मात्र रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे आल्या आहेत. त्यांनी यावर अनेकवेळा कडक कारवाई देखील केली. जर असा कोणी दुवा आपल्याला पैशांची मागणी करत असेल तर त्याची माहिती तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई या ठिकाणी संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना आता मंत्रालयात जाण्याची गरज नसून, पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया करुन वैद्यकीय मदत मिळविता येते. घरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा करण्यात आली आहे. यात एक दूरध्वनी क्रमांक, व्ह्ट्सऍप क्रमांक आणि अँड्रॉईड ऍप देखील सुरू करण्यात आले आहे. प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही CMRF सर्च करून ऍप डाउनलोड करुन घ्या. आणि त्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तसेच तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ८६५०५६७५६७ या व्हॉट्सअप क्रमांकावर Hi असा मेसेज करा, आणि तुमचा मीटिंग आयडी आणि अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती तुमच्या व्हॉट्सवर कळेल.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारे कागदपत्रे – विहित नमुन्यातील अर्ज, रुग्णाचे आधारकार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रुग्णालयाचे कोटेशन (रुग्णालय खासगी असेल तर वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकिस्तक यांच्या कडून अंगीकृत करून घ्यावे.) अपघात असल्यास एफआयआर, आमदार किंवा खासदारांचे शिफारस पत्र, सिटीस्कॅन एमआरआय रिपोर्ट
अर्ज करण्याची प्रक्रिया – वरील कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करुन घ्या, आणि मोबाईल मधील Gmail हे ऍप ओपन करा आणि aao.cmrf-mh@mah.gov.in या मेल आयडी वर डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात पाठवा. आणि कागदपत्रांची हार्ड कॉपी ही मादाम कामा रोड, मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय सातवा मजला, नवी मुंबई या पत्त्यावर स्पीड पोस्ट द्वारे पाठवा.