मकाई व आदिनाथ कारखान्यांवर त्वरीत प्रशासक नियुक्त करा व निवडणूक प्रक्रिया पार पाडा : शंभूराजे जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : निवडणुक नीधी व परिपूर्ण मतदार यादी सादर करण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याने मकाई व आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांवर त्वरीत प्रशासक नेमावा व निवडणुक प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ३० डिसेंबर २०२१ रोजी मकाई व १९ मे २०२२ रोजी आदिनाथच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डॉ पी एल खंडागळे यांनी १ मार्च २०२२ पासून ३० जून २०२२ च्या आत पात्र सहकारी संस्थांच्या निवडणूका पार पाडण्या बाबत १५ फेबुवारी २०२३ रोजीच आदेश दिलेले आहेत.
तरी देखील मकाई व आदिनाथ साखर कारखान्याच्या सत्ताधार्यांकडून पराभवाच्या भितीने निवडणुक नीधी व परिपूर्ण मतदार यादी सादर करणेस जाणीवपुर्वक विलंब केला जात आहे . नुकतेच राहुरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखान्यावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कळवून देखील निवडणूक निधी जमा न केल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नियुक्त करणेत आले आहे. त्याच धर्तीवर शासनाने तात्काळ मकाई व आदिनाथचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यांवर प्रशासक नियुक्त करावा व प्रशासकाच्या अधिपत्याखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी भाजपाचे युवानेते शंभुराजे जगताप यांनी केली आहे.
