विहिरीच्या पाण्यावरून वाद – चौघाकडून तिघांना मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : विहिरीचे पाणी घेण्यावरून झालेल्या वादानंतर दुसऱ्या दिवशी चौघांनी येऊन तिघांना वायररोपने मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार १२ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता पोथरे येथे घडला आहे. या प्रकरणी धनंजय विष्णू खटके (रा.पोथरे) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की आम्ही पोथरे येथील राजू पवार व प्रशांत पवार यांची जमीन वाट्याने केलेली आहे. तसेच त्यापैकी काही जमीन आबा जनार्दन शिंदे यांनीही केलेली आहे. या विहिरीच्या समाईक पाण्यावरून ११ फेब्रुवारीला दुपारी एक वाजता वाद झाला होता. परंतू पवार बंधूनी तो वाद मिटविला होता.
त्यानंतर १२ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता आम्ही घरी असताना आबा जनार्दन शिंदे, सोमा जनार्दन शिंदे, रामकिसन जनार्दन शिंदे व काका जनार्दन शिंदे (सर्व रा. पोथरे) हे आले व त्यावेळी तुम्हाला लय माज आलाय का.. असे म्हणून त्यांनी माझ्या आईला वायररोपने दंडावर मारले. ती भांडणे मी सोडविण्यासाठी गेलो असता आबा जनार्दन शिंदे यांनी त्याच्या हातातील वायररोपने मारले. तर माझे वडील विष्णू यांना सोमा शिंदे, रामकिसन शिंदे व काका शिंदे यांनी वायररोपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जाताना तुम्हाला जिवंत सोडत नसतो अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलीसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करत आहेत.
