भटके व पाळीव कुत्र्यांचा बंदोबस्त करा..  –  ग्राहक पंचायत -

भटके व पाळीव कुत्र्यांचा बंदोबस्त करा..  –  ग्राहक पंचायत

0



करमाळा/ संदेश प्रतिनिधी


करमाळा, ता.22: शहरातील वाढत्या भटके व पाळीव कुत्र्यांच्या समस्येबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तर्फे करमाळा नगरपरिषदेकडे निवेदन देण्यात आले. हे निवेदन कार्यालयीन अधीक्षक श्री. कविटकर व स्वच्छता निरीक्षक श्री. पुजारी यांना देण्यात आले.
निवेदनामध्ये भटक्या कुत्र्यांचे निरबिजीकरण करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात यावी, तसेच पाळीव कुत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ कलम २९३ व Animal Birth Control Rule २०२३ नुसार आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी आणताना गळ्यात पट्टा व तोंडाला जाळी घालणे बंधनकारक करावे, तसेच त्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे जमा करणे बंधनकारक करावे, उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे नोंदवावेत व तक्रारींसाठी नगरपरिषदेकडून स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. माधुरीताई परदेशी, जिल्हा कोषाध्यक्षा सौ. ललिता वांगडे, करमाळा तालुका संघटक श्री. अजिम खान, सदस्य सौ. निलिमा पुंडे, सौ. मंजिरी जोशी व श्री. अशपाक सय्यद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!