आश्लेषा बागडे हिला “यशवंत श्री” पुरस्कार जाहीर..

करमाळा (दि.१०): येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आश्लेषा बागडे हिने कुस्ती स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे, त्यामुळे महाविद्यालयाच्यावतीने आश्लेषा हिस यशवंत श्री पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या १२ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करून सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यशवंत श्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र, ५१,००० रुपये असे आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा १२ मार्च २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी होणार आहे. विलासराव घुमरे सर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा विजयश्री सभागृहात सकाळी १०.०० वा संपन्न होणार आहे, असे विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील यांनी माहिती दिली.






