एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत आश्लेषाने पटकावले ब्रॉन्झ पदक – महाविद्यालयाकडून सत्कार

करमाळा (दि. १७): येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आश्लेषा कल्याण बागडे हिने कझाकिस्तान येथे पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत ब्रॉन्झ पदक पटकावले. तिच्या या गौरवशाली कामगिरीबद्दल महाविद्यालयात यशवंत परिवाराच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील होते. यावेळी मंचावर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल-कोलते, मिलिंद फंड, डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कल्याण बागडे व सत्कारमूर्ती आश्लेषा बागडे उपस्थित होते.

रश्मी बागल-कोलते यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “आश्लेषा बागडेने मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे. कुस्तीमध्ये देखील प्रगती करून नाव कमवता येते, हे तिने सिद्ध केले आहे.”
यावेळी रश्मी बागल यांनी दिगंबरराव बागल प्रतिष्ठानच्या वतीने आश्लेषाला प्रोत्साहनपर ५१,००० रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली.

या कार्यक्रमात ‘यशवंत’ या महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या वार्षिक अंक स्पर्धेत ललित गद्यात्म विभागात हिंदी विभागाच्या अमित सरवदे याने मिळवलेल्या तृतीय क्रमांकाबद्दल त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मुक्ता काटवटे यांनी तर आभार प्रा. नितीन तळपाडे यांनी मानले.कार्यक्रमास यशवंत परिवारातील सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


