दहावीत ९८% गुणांची कमाई करणाऱ्या असीमचा करमाळा मुस्लिम समाजाकडून सत्कार

करमाळा, ता. १६: दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण मिळविणाऱ्या असीम सादिक बागवान याचा सकल मुस्लिम समाज व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.

असीम बागवान हा करमाळा येथील बागवान हॉस्पिटलचे डॉ. सादिक बागवान यांचा चिरंजीव आहे. तो लातूर येथे शिक्षण घेत आहे. त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या सत्कारप्रसंगी समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना असीम बागवान याने आपल्या यशाचे श्रेय परमेश्वराबरोबरच आजी-आजोबा, आई-वडील, काका डॉ. समीर बागवान, काकी डॉ. अफरीन बागवान तसेच शिक्षकवृंद यांना दिले. असीमने पुढे वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचा संकल्प व्यक्त केला असून, त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देऊन सोलापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील पहिले जिल्हाधिकारी होण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली.

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अलीम शेख, व्यापारी जहाँगीर शेठ बागवान, डॉ. समीर बागवान, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, सचिव रमजान बेग, इकबाल शेख, उद्योजक जावेद सय्यद, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, कलीम शेख, अरबाज बेग, शाहीद बेग आदी मान्यवर उपस्थित होते.



