अवघ्या पाचव्या वर्षी जुनेदचा कडक रोजा पूर्ण; चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक

करमाळा: मुस्लिम धर्मीयांमध्ये पाच स्तंभांपैकी रोजाला विशेष महत्त्व आहे. सध्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून उपवास, प्रार्थना आणि संयम यांना विशेष महत्त्व दिले जाते. अशा या कडक रमजान महिन्यात करमाळा शहरातील खंदक रोड परिसरातील पाच वर्षीय जुनेद ईमत्याज पठान या चिमुकल्याने आपला पहिला रोजा पूर्ण केला आहे.

अवघ्या लहान वयात पूर्ण दिवस उपवास करून जुनेदने रमजानचा पहिला रोजा यशस्वीरीत्या पार पाडला. त्याने हा रोजा जामिया मशिदीत सोडला. त्याच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
जुनेद हा करमाळा येथील रहिवासी ईमत्याज हबीब पठान यांचा चिरंजीव आहे. लहान वयात दाखविलेल्या धार्मिक निष्ठेमुळे त्याचे समाजातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

सकल मुस्लिम समाजाचे तालुका अध्यक्ष कलीम काजी, शहराध्यक्ष जमीर सय्यद, अब्दुल कलाम फाऊंडेशनचे समीर शेख, रमजान बेग, रहेनुमा संघटनेचे सुरज शेख तसेच रोहित पवार फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष मुस्तकीम पठान यांनी त्याचे विशेष कौतुक केले.या यशासाठी त्याला आई-वडील, चुलते-चुलती तसेच आजोबा हबीब दुलेखा पठान यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.

