जीर्णोद्धारानंतर करमाळा येथील राम मंदिरात ‘रामलल्ला’ प्राणप्रतिष्ठापना संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : वेताळपेठ येथील राममंदिरात अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर येथेही रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना उत्सव वेदमुर्ती संजय मुळे (शेवगाव) यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी होती. देशात अयोध्या, नारायणपूर आणि करमाळा या तीनच ठिकाणी राममुर्ती प्रतिष्ठापना समारंभ झाला.
करमाळा शहरात यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीराम मंदिराचा अतिशय देखणा जिर्णोध्दार केला आहे. विशेष म्हणजे पूर्वीचे मंदिर पूर्णत: काढून अत्यंत विलोभनीय असे नवीन मंदिर बांधले असून अयोध्याच्या समारंभाबरोबरच येथील मंदिरातही श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमास विशेष महत्व प्राप्त झाले होते. करमाळा शहरासह तालुक्यातील अनेक गावातून भाविकांनी येथे गर्दी केली होती.
२० जानेवारीला मंदिराची वास्तुशांती, २१ जानेवारीला शोभायात्रा तर २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना सह महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमाला शहरवासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. सायंकाळी भजनाचाही कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये ह.भ.प.कानिफनाथ महाराज आगम व खोलेश्वर भजनी मंडळ सहभागी झाले होते.
श्रीराम मंदिर प्रतिष्ठानचे विश्वस्त खुशालभाई देवी, महेश परदेशी यांनी मंदिर उभारण्याचे योग्य नियोजन केले. त्यानंतर मंदिर उभारणीमध्ये विजय देशपांडे, दर्शन कुलकर्णी यांनी विशेष सहभाग घेऊन मंदिराच्या परिपूर्ततेसाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यांना रूपेश वनारसे, विवेक इनामदार, राधेशाम देवी, अनुप मुनोत, गणेश देशपांडे, आकाश वीर, शशिकांत स्वामी, किरण स्वामी, योगेश सुर्यपुजारी, पिसे, अजिंक्य काळे, सागर वनारसे, राहुल वनारसे, रोहित वनारसे आदी व शिवम् मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.