‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या बाजारात बनावट आवृत्त्या – लेखक ओहोळ यांचे वाचकांना आवाहन…

करमाळा(दि.३): करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र व प्रसिद्ध लेखक, व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ या लोकप्रिय पुस्तकाच्या बनावट आवृत्त्या बाजारात विकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन पनवेलमध्ये सुरू असलेल्या संविधान महोत्सवात पुस्तकांच्या पायरेटेड आवृत्त्या विकल्या जात असल्याची तक्रार आल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी पुस्तक विक्रेता मनमोहन मिश्रा याला 125 बनावट पुस्तकांसह ताब्यात घेतले. जप्त साहित्याची किंमत अंदाजे ₹43,550 इतकी आहे.
ही कारवाई सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांच्या सजगतेमुळे उघडकीस आली. त्यांनी पुस्तकातील गुणवत्तेतील फरक लक्षात घेऊन ते थेट लेखक जगदीश ओहोळ यांना दाखविले. पुस्तक बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि आरोपीला रंगेहात पकडले.

लेखक जगदीश ओहोळ यांची वेदनादायी प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणानंतर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनी फेसबुकवर भावनिक प्रतिक्रिया देत साहित्यविश्वातील या गंभीर गुन्ह्याकडे लक्ष वेधले.
त्यांनी सांगितले की— काही समाजकंटकांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या डुप्लिकेट प्रती बनवल्या आहेत व मागील काही महिन्यांपासून ते या डुप्लिकेट प्रती विकून वाचक, लेखक व प्रकाशकाची फसवणूक करत आहेत. आयुष्यातील दहा-बारा वर्ष संशोधन, लेखन, वाचन यासाठी घालून हे पुस्तक आकारास आलं होतं. वाचकांनी या पुस्तकाला भरभरून प्रेम दिलं. ते पुस्तक अशा प्रकारे डुप्लिकेट बनवलं जावं हे माझ्यासाठी खूप मानसिक त्रास देणारं व वेदनादायी आहे.

दोन वेगवेगळ्या बनावट आवृत्ती
पुस्तकाच्या दोन वेगवेगळ्या पायरेटेड आवृत्त्या राज्यभर फिरत असल्याचे त्यांनी उघड केले. विदर्भ–मराठवाड्यात २१ व्या नकली आवृत्तीची विक्री सुरू असून, पुणे–मुंबई विभागात ५१ व्या आवृत्तीला ‘विशेष आवृत्ती’ नावाने बनावट पुस्तक प्लास्टिक पॅकिंगमध्ये विकले जात आहे

याविषयी अधिक माहिती देताना लेखक ओहोळ म्हणाले की, जगदीशब्द प्रकाशनाकडून अधिकृतपणे ६०/६१ व्या आवृत्ती वितरित होत आहे व हे गुन्हेगार अजूनही २१ वी नकली आवृत्ती विकत आहेत. ही नकली प्रत मला अकोला शहरामध्ये अशोक वाटिका जवळ विक्री होताना सापडली तर ५१ व्या आवृत्तीची कॉपी पनवेल मध्ये विक्री करताना सापडली. नकली प्रती विकणाऱ्या अकोल्यातील एका विक्रेत्याने तर सांगीतले की, “सगळी दुनिया नकली विकते, मग मी विकल म्हणून काय बिघडलं.? तुम्हाला काय करायचं ते करा, कोर्टात जा.” या भाषेत डुप्लिकेट प्रति विकण्याचं समर्थन केलं.

ओहोळ यांनी पोलिसांनी मूळ सूत्रधारापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगून, पायरेटेड पुस्तकांच्या मजकुरात कोणत्याही चिथावणीखोर बदलामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते, असा गंभीर इशाराही दिला.
“तुमच्याकडे नकली प्रत असेल तर मला नक्की संपर्क करा (मो.99218 78801)” असे आवाहन त्यांनी वाचकांना केले आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांकडून वेगवान आणि निष्पक्ष तपासाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
