दहीहंडी कार्यक्रमातील वादातून युवकावर कुऱ्हाडीने हल्ला..

करमाळा : शहरातील गायकवाड चौक येथे दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री दहीहंडी सोहळ्यादरम्यान झालेल्या किरकोळ वादाने उग्र रूप धारण केले. या वादातून एका युवकावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

फिर्यादी गितेश नामदेव कांबळे (वय 27, रा. सिद्धार्थनगर, ता. करमाळा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दहीहंडी कार्यक्रम सुरु असताना त्यांचे मित्र अमित लोंढे व सोमनाथ बोरकर यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यावेळी मध्यस्थी करण्यासाठी मी पुढे गेलो असता, सोमनाथ बोरकर याने मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करून माझ्यावर हात उगारला.

यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास सोमनाथ बोरकर हा हातात कुऱ्हाड घेऊन माझ्या घरी धडकला. “आता तुला सोडणार नाही” असे धमकावत त्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने माझ्या डोक्यात जबर मार केला. या हल्ल्यात माझी आई बिजाबाई यांनी हस्तक्षेप करून माझा जीव वाचवला. जखमी गितेश कांबळे यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेचा पुढील तपास करमाळा पोलिसांकडून सुरू आहे.

