विठूनामाच्या गजरात जेऊर मधील भारत मॉन्टेसरी व प्रायमरी स्कूलची बाल दिंडी उत्साहात संपन्न

करमाळा(दि. 8) : प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही भारत मॉन्टेसरी व भारत प्रायमरी स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेली बाल दिंडी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. शाळेतील बालगोपाळांनी पारंपरिक वेशभूषा करून “विठ्ठल-विठ्ठल”च्या गजरात आणि फुगडी खेळत शहरात आनंदमयी फेरी काढली.
दिंडीसाठी मुले वारकऱ्यांच्या पारंपरिक गणवेशात, तर मुली नऊवारी साड्यांमध्ये सजून सकाळपासूनच शाळेत दाखल झाल्या होत्या. संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग नोंदवत एक वेगळा भक्तिपर अनुभव घेतला.
शाळेतून ते एस.टी. स्टँडपर्यंत ही दिंडी फेरी नेण्यात आली. दिंडीचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष मा. राजू शेठ गादिया यांनी तोफा उडवून केले व विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कुमार दोशी यांनीही सर्व मुलांना बिस्किट वाटप केले.
दिंडीदरम्यान पालक दीपक बोराडे, भूषण लुंकड, अजय सोळंकी यांनी चॉकलेट वाटप करून मुलांना आनंद दिला.
सदर उपक्रमासाठी पखवाज वादक भागवत सरक व विठ्ठल भक्त भीमराव कोंडलकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचे तसेच इतर सहभागी पालकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी भारत मॉन्टेसरी व प्रायमरी स्कूलचे सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.
या भक्तिमय व भावनिक वातावरणात पार पडलेल्या दिंडीचे संस्थेचे सर्व पदाधिकारी व पालकांनी विशेष कौतुक केले असून, विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख आणि संस्कार रुजविण्याचा एक सुंदर उपक्रम म्हणून या दिंडीकडे पाहिले जात आहे.