मराठा मंदिर जागेच्या संदर्भात बलभीम राखुंडे यांना अंतरिम जामीन मंजूर.. - Saptahik Sandesh

मराठा मंदिर जागेच्या संदर्भात बलभीम राखुंडे यांना अंतरिम जामीन मंजूर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मराठा मंदिर जागेच्या संदर्भात 1) बलभीम विष्णू राखुंडे 2) मनोहर हरिबा इंगोले 3) योगेश सुरेश राखुंडे 4) नागेश बलभीम राखुंडे यांच्याविरुद्ध IPC Section 420 465 468 471 व 34 प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली होती, यामध्ये बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे.सी.जगदाळे यांनी बलभीम राखुंडे यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यात आरोपींच्यावतीने ॲड.निखिल पाटील व ॲड.सुहास मोरे यांनी काम पाहिले.

यात हकीकत अशी कि, मराठा मंदिर सार्वजनिक न्याय मुंबई यांच्यावतीने प्रशासकीय अधिकारी बिपिन यशवंत मालगुंडकर यांनी करमाळा येथील न्यायालयात 1) बलभीम विष्णू राखुंडे 2) मनोहर हरिबा इंगोले 3) योगेश सुरेश राखुंडे तसेच नागेश बलभीम राखुंडे यांच्याविरुद्ध IPC Section 420 465 468 471 व 34 प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती. सदर खाजगी फिर्यादीची दखल करमाळा येथील न्यायाधीश यांनी घेऊन आरोपी विरुद्ध FIR रजिस्टर करण्याचे आदेश दिले. करमाळा पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध FIR दाखल झाला, यातील आरोपी बलभीम विष्णू राखुंडे यांनी ॲड निखिल पाटील व ॲड. सुहास मोरे यांचे मार्फत बार्शी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला. यात जामीन अर्जाची सुनावणी न्यायाधीश जे.सी.जगदाळे यांचे समोर झाली.

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले होते कि, आरोपी नं एक ते चार यांनी संगनमताने फिर्यादी संस्थेची करमाळा येथील कोट्यावधी किंमत असणारी गट नंबर 243 ही स्थावर मिळकत बनावट दस्त व बनावट कागदपत्रे तयार करून तसेच अधिक्षक सार्वजनिक न्यायाधिकरण नोंदणी कार्यालयात खोटे व बनावट कागदपत्र सादर करून गट नंबर 243 या जमिनीच्या सातबारा पत्रकी सन 1988 साली फेरफार नोंद क्रमांक 155 ही तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून अधीक्षक अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सोलापूर असे नाव दाखल करून फसवणूक केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती तसेच सदरची जागा ही मोक्याच्या ठिकाणी असून ती सन 1947 सालि आनंदराव शिंदे यांनी शैक्षणिक उपयोगासाठी मराठा मंदिर मुंबई या संस्थेस बक्षीस पत्राने दिलेली होती अशा आशयाची खाजगी फिर्याद दाखल झाली होती.

यात आरोपीचे वकील ॲड.निखिल पाटील व ॲड.सुहास मोरे यांनी त्यांचे युक्तिवादात फिर्याद दाखल करण्यास जवळपास 35 वर्षांचा विलंब झालेला असून, विलंबाबाबत कोणतेही सक्षम कारण नाही तसेच बलभीम राखुंडे यांनी सदर जागेचा आजपर्यंत कोणताही दुरुपयोग केला नाही, याउलट सदर जागेबाबत चालू असलेल्या अनेक खटल्यामध्ये व अपिलामध्ये त्यांनी संस्थेची बाजू मांडून त्या जागेचे समाजाचे हितासाठी संरक्षणच केलेले आहे, संपूर्ण केस कागदोपत्री पुराव्यावर आधारित असून सदरची बाब दिवाणी स्वरूपाची असल्याचा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून बलभीम विष्णू राखुंडे यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲड.निखिल पाटील व ॲड.सुहास मोरे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!