मांजरगावमध्ये बळीराजा महोत्सव उत्साहात संपन्न!

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२३: मांजरगाव (ता. करमाळा येथे बलीप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर बळीराजा महोत्सवाचे आयोजन उत्साहात पार पडले. सजविलेल्या बैलगाडीतून बळीराजाच्या प्रतिमेची ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत फेटे बांधलेले शेतकरी, युवक व माता-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता. “इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती संतोष पाटील, माजी सरपंच साधना खरात व ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी “बळीला वंदुया” या विषयावर बळीराजाचा इतिहास सांगत प्रभावी भाषण केले.

या प्रसंगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे, अहिल्यानगरचे कामगार उपायुक्त भिसले, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, ‘मदार’ चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत हुंबे, मराठा सेवासंघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे आदींची भाषणे झाली.
तसेच संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन खटके, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुहास पोळ, शिक्षण विस्तार अधिकारी हनुमंत ढेरे, रिटेवाडीचे सरपंच किशोर रिटे, माजी सरपंच दादासाहेब कोकरे, मकाईचे संचालक संतोष पाटील, माजी सरपंच कल्याण मोरे, तुकोबाय वाचनालयाचे अध्यक्ष प्रभाकर मोरे, पोलिस हवालदार नितीन चव्हाण, माजी उपसरपंच नवनाथ चव्हाण, दादासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहिले.

जय हनुमान लेझीम मंडळ, तुकोबाराय वाचनालयाचे पदाधिकारी व श्री स्टॉक मार्केट ॲकॅडमीचे गणेश हुबे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



