करमाळ्यातील सावंत कुटुंबीयांकडून बैलपोळा सोहळा थाटामाटात

करमाळा : ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारा बैलपोळा सण आज यांत्रिकीकरणामुळे बहुतांश ठिकाणी फक्त नावापुरता उरला आहे. मात्र करमाळा शहरातील सावंत कुटुंबाने गेली अनेक दशके ही परंपरा जिवंत ठेवली आहे. दरवर्षी जामखेड, गेवराई, राशीन, कुर्डूवाडी, काष्टी आदी भागांतून जिवंत बैलजोड्या खरेदी करून पोळा साजरा करण्याचा सुंदर उपक्रम या कुटुंबाकडून सातत्याने केला जातो. यावर्षीही सात बैलजोड्यांच्या खरेदीसह हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुऊन हळदीने मळणी करण्यात आली. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना अंघोळ घालून शिंगांना सोनेरी रंग देण्यात आला. गुलाल, बेगड, हारांनी सजवलेल्या या बैलजोड्यांची भव्य मिरवणूक सावंत गल्लीतील मारुती मंदिरापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख चौकांतून निघाली. ढोल-ताशे, बँड, संबळ आणि हलगींच्या गजरात काढलेल्या या मिरवणुकीत सावंत कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मार्गातील महिला भगिनींनी या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. सायंकाळी मिरवणूक पुन्हा सावंत निवासस्थानासमोर पोहोचली. तेथे पारंपरिक पद्धतीने बैलांचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांसाठी पुरणपोळीच्या जेवणाचा खास बेत ठेवण्यात आला होता.

या सोहळ्यात विठ्ठल आप्पा सावंत, गोपाळ बापू सावंत, दादासाहेब सावंत, भगवान नाना सावंत, ॲड. राहुल सावंत, माजी नगरसेवक संजय (पप्पू) सावंत, सुनील बापू सावंत, व्यापारी किरण सावंत यांच्यासह सावंत यांच्यासह सचिन गायकवाड, दादा इंदलकर, गोविंद किरवे, फारूख जमादार, दिपक सुपेकर, अल्लाउद्दिन शेख, हुमरान मुलाणी, सरपंच चंद्रकांत काळे, सरपंच दौलत वाघमोडे, गणेश मुरूमकर, चेअरमन विलास दळवी, विलास नलवडे, सरपंच धनंजय शिंदे, अशोक दोशी, व्यापारी संतोष गाडे (कुर्डू), सारंग ढवाण (काष्टी), सारंग भोसले (काष्टी), दासा मोडाळे (राशीन), मच्छिंद्र काळे (राशीन), संदीप जाधव (पाडळी), शिवाजी झिपे पेडगाव, जनाबापू कायगुडे पेडगाव, बाळू काटकर पेडगाव, विशाल गवळी पेडगाव, तुकाराम बालसिंग वाळकी, दामू थोरात यवत, वैभव तुले यवत, भारत मोडाळे राशिन, राजू तांबोळी ,दादा शेळके, बापू साळुंखे, बायू कुरेशी, गुलाम घोस, वजीर सय्यद, आण्णा कवितके आदी मान्यवरांसह सावंत गल्ली येथील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या तब्बल ७२ वर्षांपासून सावंत कुटुंबीय ही परंपरा जपताना दिसतात. हमालीचा व्यवसाय करणारे स्व. अनंता आबा सावंत यांनी एका खोंडापासून सुरू केलेला जनावरांचा व्यवसाय नंतर स्व. सुभाष (अण्णा) सावंत यांनी पुढे नेला. आज विठ्ठल आप्पा सावंत व त्यांचे बंधू या परंपरेला जीवंत ठेवत आहेत.

“बैलांचा शेतीसाठी वापर कमी झाला असला तरी भावी पिढीला परंपरेची ओळख व्हावी म्हणून आम्ही दरवर्षी बैलजोड्या विकत घेऊन बैलपोळा उत्साहात साजरा करतो,”
– विठ्ठल आप्पा सावंत
“आमचे आजोबा आणि वडील यांनी जनावरांचा व्यवसाय उभा केला. पोळा हा शेतकऱ्यांचा दिवाळी समजला जातो. तो बैलांच्या अभावामुळे थांबू नये म्हणून आम्ही बैलजोड्या खरेदी करून परंपरा जिवंत ठेवली आहे”
– ॲड. राहुल सावंत
“आमचे वडील विठ्ठल आप्पा सावंत यांनी कर्नाटकासह विविध बाजारातून देखण्या बैलजोड्या आणून विक्री केली. आज बैलजोड्यांचा व्यवसाय कमी झाला असला तरी दुभत्या जनावरांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे,”
– किरण सावंत
