बोलता येत नसल्यामुळे “नद्या प्रदूषण मुक्त कराव्यात” अशी मागणी बंडातात्यांनी कागदावर लिहून फडणवीसांना केली
करमाळा/संदेश प्रतिनिधी – युवक मित्र बंडातात्या कराडकर यांना गुरुवारी ता.१२ रोजी पक्षाघाताचा त्रास झाला होता. त्यांच्यावर प्राथमिक उपचार फलटण येथील खाजगी रुग्णालयात करण्यात आले. शुक्रवार ता.१३ रोजी पुढील उपचारासाठी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अचानकपणे कोणताही लवाजमा सोबत न घेता रुग्णालयात येऊन तात्यांची विचारपूस केली आणि योग्य त्या सूचना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिलेल्या आहेत.
अशा कठीण परिस्थितीतही बंडातात्यांनी बोलता येत नसल्यामुळे कागदावर लिहून “नद्या प्रदूषण मुक्त कराव्यात” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांना केली. हे वाचून देवेंद्र फडणवीस भावुक होऊन तात्यांना म्हणाले,” तात्या काय तुमची निष्ठा आहे ! तुम्ही लवकर बरे व्हा! तुमची गरज महाराष्ट्राला आहे!” याविषयी चा व्हिडीओ बातमीच्या खाली दिला आहे.
बंडातात्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली ,रुग्णालयाच्या बाहेर बंडातात्यांचे अनुयायी आणि राज्यातील जेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र रुग्णालयाचे कडक नियम पाळून कुणीही आत प्रवेश करत नाही.
प्रत्येक जण आपआपल्या परीने परमेश्वराकडे आपल्या परमभक्तास पांडुरंगाने लवकर बरे करावे. अशी प्रार्थना करीत आहेत. बंडातात्यांच्या मेंदू वरती गाठ आली असून तात्यांनी किर्तन, प्रवचन सेवेत आपल्या शरीराकडे लक्ष दिले नाही. तात्याना मधुमेह असूनही त्यांनी खूप प्रवास केल्यामुळे असे झाल्याचे त्यांचे निकटचे सहकारी बोलतात.