भांगे प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कंदर(संदीप कांबळे) : करमाळा तालुक्यातील कंदर येथील श्री शंकरराव भांगे (मालक) प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करमाळा येथील तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ भांगे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कंदरचे लोकनियुक्त सरपंच मौलासाहेब मुलाणी, विलास माने, रामचंद्र भगत, अतुल पाटील, धनाजी बचुटे तसेच प्रशालेचे संस्थापक सचिव सुनील भांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा अविष्कार सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. देशभक्तीपर व भक्तिमय गीतांसह लोकगीते, कोळीगीते, कव्वाली तसेच हिंदी व मराठी चित्रपटांतील गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करण्यात आले.

यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सुनीता लांडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका रेश्मा उबाळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

