साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे समाजकारणात असलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा – युवराज जगताप
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती येत्या १ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे, साहित्य आणि समाजकारणात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे विशेष योगदान आहे, मागास मातंग समाजातून पुढे आलेल्या आण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाच्या व्यथा , वेदना आपले साहित्य व शाहिरी कृतीतून अतिशय परीणामकारकरित्या मांडल्या आहेत. अशा या थोर समाज सुधारकास भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी करमाळा मातंग समाजाचे युवा नेते युवराज जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे केली आहे.
आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले आहे, त्यांच्या कालखंडात जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले.
तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय भाऊंना जाते. तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावरील त्यांची ‘वैजयंता’ हि कादंबरी, तर भीषण दुष्काळात ब्रिटीशांचे खजिने व धान्य गोदाम लुटून गोरगरिबांना व श्रमिकांना वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगणारी ‘फकीरा’ ह्या त्यांचा काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. मातंग समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणेबाबत योग्य तो निर्णय व्हावा अशीही मागणी श्री.जगताप यांनी केली आहे.