गाईंची अवैधपणे वाहतूक करणारा पिकअप भिलारवाडीत पडकला – करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा (दि.२७): भिलारवाडी (ता. करमाळा) येथील आरोही पेट्रोल पंपासमोर एका पिकअप वाहनातून निर्दयतेने कोंबून नेल्या जाणाऱ्या गायी आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस शिपाई सोमनाथ विठ्ठल कांबळे (वय 32, रा. करमाळा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते आपल्या सहकाऱ्यांसोबत जिंती हद्दीत गस्त घालीत होते. दुपारी 12.45 वाजता आरोही पेट्रोलपंपाजवळील भिलारवाडी परिसरात एक पिकअप (क्र. MH-45-AX-1323) संशयास्पदरीत्या जाताना दिसल्याने त्यास थांबवले. वाहनात गायींचा आवाज आल्याने तपासणी केली असता, तीन गायी निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

पिकअप चालकाने आपले नाव मयुर शिवाजी सुरवसे (रा. खडकेवाडी, ता. करमाळा) असे सांगितले. चौकशीत त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची पावती, परवाना वा वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. त्याने ही जनावरे अफझल इक्बाल कुरेशी (रा. आंबेडकर नगर, राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्या सांगण्यावरून नेत असल्याचे सांगितले.
पुढील तपासासाठी पिकअपसह चालकास करमाळा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धुमाळ यांनी गायींची तपासणी करून त्यांना चारा-पाण्याची व औषधांची कोणतीही व्यवस्था न करता वाहतूक करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. पोलिस निरीक्षक संदीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला.

या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1), 11(1)(अ), 11(1)(फ), 11(1)(ह), 11(1)(आय), 11(1)(क) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 चे कलम 5(अ) व 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बालाजी घोरपडे हे करत आहेत.



